मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकांची राजकीय रंगत चढत असताना, एका बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली, तर दुसऱ्या बाजूला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील निर्णयांमुळे प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक क्षेत्राशी निगडित प्रश्नांना गती मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेला आणि मंत्रिमंडळ बैठकीला थेट संबंध नसला, तरी दोन्ही घडामोडी जवळजवळ एकाच काळात जाहीर झाल्याने त्यांच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
मंत्रिमंडळाचे चार प्रमुख निर्णय
१ ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ व सरपंच संवाद कार्यक्रम
ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
(सामान्य प्रशासन विभाग)
२ बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित
जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्यास मंजुरी.
(ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
३ धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)
४ नगरपरिषदा अधिनियमात सुधारणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.
थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देण्यासाठी अध्यादेश काढला जाणार.
(नगर विकास विभाग)


