मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगत असताना ठाकरे बंधूंनी केलेल्या युती घोषणेनं राजकीय वातावरण अजूनच तापलं आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर भाजपने तीव्र भूमिका घेत पहिली प्रतिक्रिया नोंदवली. भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी ‘एक्स’वरून (ट्विटर) केलेल्या पोस्टद्वारे या युतीवर खोचक टीका केली.
घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी…एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 24, 2025
शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत प्रश्नांची सरबत्ती केली. “जेव्हा पक्षाचा ताबा काही कारकुनांनी घेतल्याचा आरोप तुम्ही करत होतात, तेच लोक आज सोबतीला कसे? एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात भागीदार व्हायचे नव्हते, असे म्हणणारे आता त्यांच्यासोबत जाणार कसे?” अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
“मुंबईकर आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत जुनी भाषणे समोर ठेवतील. मग आरशात पाहताना भीती वाटणार नाही का?” असा सवाल करीत पालिकेच्या तिजोरीवर डोळा असल्याचा आरोपही त्यांनी सूचित केला.
“वादापेक्षा महाराष्ट्र मोठा” राज ठाकरे
युती घोषणेच्या वेळी राज ठाकरे यांनी या निर्णयामागील पार्श्वभूमी उलगडली.
“कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, इथूनच आमच्या संवादाची सुरुवात झाली,” असे ते म्हणाले.
जागावाटपाबाबत मात्र त्यांनी गोपनीयतेची भूमिका घेतली.
“कोण किती जागा लढवणार, हा आकडा आम्ही सांगणार नाही. दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाणार असून पुढील प्रक्रियेची माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारी ही युती औपचारिकरित्या जाहीर होताच राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे; तर दुसरीकडे भाजपकडून सुरू झालेल्या टीकेमुळे या युतीची पुढील राजकीय परीक्षा आता निवडणुकांच्या रणांगणात होणार आहे.


