पुणे प्रतिनिधी
पुणे–बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका टुरिस्ट कारचा झालेल्या जबरदस्त धडकेत आठ जण जिवंत जळून मृत्युमुखी पडले, तर तब्बल २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. कात्रज बोगद्याकडून उतारावरून येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव वेगात उतारावरून येत असलेल्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाले. नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या आठ ते दहा वाहनांना जबरदस्त धडक दिली. या धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे ज्वाळा आकाशाला भिडल्या. संपूर्ण परिसर क्षणात धुराने आणि जळत्या वाहनांच्या किंकाळ्यांनी थरथरला.
या ठिकाणी सेल्फी पॉइंटजवळ उभी असलेली एक टुरिस्ट कार कंटेनरच्या धडकेत दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकली. कारमध्ये असलेल्या दोन महिला आणि एका मुलीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लिनर यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मात्र तोपर्यंत वाहनांचे सांगाडेच उरले होते.
रात्री आठ वाजेपर्यंत बचाव पथकाने आठ मृतदेह बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
या परिसरात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात. हा अपघात शेवटचा ठरावा,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.


