शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांनी भीतीचं सावट निर्माण केलं आहे. गावोगावी पशुधनाचा बळी आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ल्यांच्या घटना घडल्याने ग्रामस्थांचा थरकाप उडाला आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर गावातील महिलांनी स्वतःच स्वसंरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आणि तीही अत्यंत अनोख्या पद्धतीने.
पिंपरखेडच्या शेतकरी महिलांनी आता आपल्या गळ्यात “टोकदार खिळ्यांचा पट्टा” घालायला सुरुवात केली आहे. लोखंडी किंवा जाड रबराच्या पट्टीसारख्या या पट्ट्यांवर लहान पण धारदार खिळे बसवण्यात आले आहेत. बिबट्या प्रामुख्याने मानेवर झडप घालून हल्ला करतो, त्यामुळे या पट्ट्यामुळे तो हल्ला निष्फळ ठरतो, असा महिलांचा विश्वास आहे.
“आमचं जगणं शेतीवर आहे. रोज शेतात कामाला जातो. पण भीती अशी की कधी बिबट्या मागून झडप घालेन, सांगता येत नाही. मग आम्ही ठरवलं की काहीतरी उपाय करायचाच,” असं गावातील एका महिलेनं सांगितलं. “कुत्र्यांच्या गळ्यात जसे खिळ्यांचे पट्टे असतात तसेच आम्ही आमच्यासाठी बनवले. प्रशासनाकडून काहीच होत नसल्याने आम्हीच आमच्या जीवाची जबाबदारी घेतली,” ती म्हणाली.
गावात नुकत्याच घडलेल्या घटनेत बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला, मात्र कुत्र्याच्या गळ्यातील खिळ्यांच्या पट्ट्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याच दृश्याने या महिलांना प्रेरणा मिळाली. आज गावातील अनेक महिला हा ‘खिळ्यांचा कवच’ घालून शेतात काम करताना दिसतात.
सोशल मीडियावर महिलांच्या या धैर्यपूर्ण उपक्रमाचे छायाचित्र व्हायरल झाले असून, या ग्रामीण स्त्रियांच्या जिद्दीचे आणि कल्पकतेचे कौतुक सर्वत्र होत आहे. भीतीच्या वातावरणातही ‘आपलं रक्षण आपणच’ या आत्मविश्वासातून उभ्या राहिलेल्या या महिला आज गावकुसाबाहेरही चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातच नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार केले आहे. 14 वर्षीय रोहनचा जीव घेतलेल्या त्या बिबट्याला त्याच ठिकाणापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर ठार करण्यात आले. ठसे आणि नमुने तपासल्यानंतर हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याची पुष्टी वन अधिकाऱ्यांनी केली आहे.
पण या घटनेने एकच प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने नेमके पाऊल केव्हा उचलायचे? तोपर्यंत मात्र पिंपरखेडच्या महिलांचा ‘खिळ्यांचा कवच’ हा त्यांच्या धैर्याचा आणि जगण्याच्या लढाईचा प्रतीक ठरला आहे.


