सातारा प्रतिनिधी
दिवाळीच्या आनंदात संपूर्ण राज्य उजळले असतानाच सातारा जिल्ह्याच्या फलटण शहरातून आलेली एक बातमी काळजाचा ठाव घेणारी आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलच्या बंद खोलीत आत्महत्या केली. मात्र ही केवळ आत्महत्या नाही, तर आरोग्य आणि पोलिस यंत्रणेतील दबावाचे भीषण वास्तव उघड करणारी घटना आहे.

भाऊबीजेच्या दिवशी संपवले आयुष्य
गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीचा सण, भाऊबीजेसारखा दिवस, आणि त्याच दिवशी एका जिद्दी डॉक्टरने आपले जीवन संपवले. डॉक्टर तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील. आई-वडील शेतकरी, चार सख्ख्या भावंडांपैकी एक ती, परिस्थिती बेताची तरी वैद्यकीय शिक्षणासाठी झगडली.
जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण करून ती महाबळेश्वरला सहा महिने कंत्राटी काम करून फलटण उपजिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी रुजू झाली. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेऊन मूळ गावी जाण्याचा तिचा बेत होता. पण त्याआधीच तिने आयुष्याचा अंत केला.
“पोस्टमार्टम राजकीय आदेशानुसार कर” दबावाचे जाळे उघड
मयत डॉक्टरच्या कुटुंबियांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत.
आतेभावाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरवर गेल्या वर्षभरापासून प्रचंड राजकीय आणि पोलिसी दबाव होता.
“रुग्णालयात बॉडी न आणता रिपोर्ट तयार करा, पोस्टमार्टम राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार करा,” असे आदेश दिले जात होते.
त्या विरोधात दोन महिन्यांपूर्वीच डॉक्टरने पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
त्या पत्रात पोलिस निरीक्षक गोपाल बदने, महाडिक नावाचे अधिकारी आणि खासदारांचे दोन पीए यांचा उल्लेख असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.
हातावर लिहिलेली नावे आणि सुसाईड नोटचा थरकाप उडवणारा मजकूर
डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेली नावे पाहून चौकशी करणारे अधिकारी थक्क झाले.
तिने स्पष्टपणे लिहिले होते.
“पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर यांनी मला मानसिक छळ दिला.”
या मजकुराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
कुटुंबीय म्हणतात, “तिने न्यायासाठी प्रयत्न केले, तक्रारी केल्या, आरटीआय टाकला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तिने जीवन संपवले.”
“न्याय मिळाला नाही, म्हणून बहिणीने शेवटचा निर्णय घेतला”
मयत डॉक्टरचा आतेभाऊ एबीपी माझाशी बोलताना म्हणाला,
“ती गेली दोन वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. गेल्या वर्षभरात ती सतत दबावाखाली होती. आम्ही वारंवार तिला धीर देत होतो, पण ती म्हणायची ‘हे सगळं माझ्याच डोक्यावर आहे.’ तीने ज्यांची नावं लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही आमची एकच मागणी आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला.
संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सीएमनी दिले आहेत.
फलटण पोलिसांवर आणि आरोग्य विभागावर आता चौकशीची झडती सुरू झाली आहे.
“ही केवळ आत्महत्या नाही, तर यंत्रणेचा आरसा आहे”
या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात संताप उसळला आहे.
एका तरुण डॉक्टरने न्यायासाठी लढा देत जीव गमावला, हा प्रश्न आता संपूर्ण राज्यासमोर उभा आहे.
रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरवरच जर राजकीय आणि पोलिस दबाव असेल, तर साध्या नागरिकाला न्याय मिळेल का, असा सवाल वैद्यकीय वर्तुळातून केला जात आहे.


