सातारा प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या डॉ. मुंडे यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या कामकाजावर चौकशी सुरू होती. या चौकशीमुळे त्या मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” असा इशारा त्यांनी यापूर्वीच आपल्या वरिष्ठांना दिल्याचे सांगण्यात येते. अखेर काल (गुरुवारी) रात्री त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस व आरोग्य विभागातील वाद, तसेच प्रशासकीय दबाव हे प्रमुख कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक डॉक्टरने अशा प्रकारे जीवन संपवल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांकडून करण्यात आली आहे.
या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सततचा कामाचा ताण, प्रशासकीय दबाव आणि चौकशांचा बोजा यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या दिशेने गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.


