सातारा प्रतिनिधी
“वय फक्त आकडा असतो” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ जर कोणी जगून दाखवत असेल तर त्या म्हणजे कराडच्या नांदगावमधील ६५ वर्षांच्या मंगला आवळे आजी! या आजींचं वय जरी साठ ओलांडलं असलं, तरी जिद्द आणि मेहनतीपुढे त्या अजूनही तरुण वाटतात. रिक्षाच्या स्टीयरिंगवर आत्मविश्वासाने हात ठेवून रस्त्यावरून सराईतपणे गाडी चालवणाऱ्या मंगला आजी सध्या कराड परिसरात चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय ठरल्या आहेत.
संघर्षातून उभी राहिलेली प्रेरणा
मंगला आजींचं आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी. पतींचं निधन मुलं लहान असतानाच झालं. त्यानंतर संसाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. तीन मुली आणि एका मुलाला शिकवणं, त्यांचं संसारात स्थैर्य आणणं हे सगळं त्यांनी मोलमजुरी करत करत पूर्ण केलं.
आज मुलगा एसटी महामंडळात चालक म्हणून काम करतो, मुलींची लग्नं झाली आहेत. पण स्वतःच्या औषधोपचारांचा खर्च आणि मुलाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंगला आजीनी ठरवलं “मी घरी बसणार नाही, मी रिक्षा चालवेन!”
‘घरी बसून काय फायदा?’ मंगला आजींचा आत्मनिर्भरतेचा मंत्र
मंगला आजी सांगतात,
“मी घरी बसून होते, पण मला वाटलं असं बसून काही उपयोग नाही. म्हणून मी रिक्षा चालवायला शिकले. मुलाने मला शिकवलं, आणि मी आत्मविश्वासाने रस्त्यावर उतरले. अनेकांनी असं धाडस केलं पाहिजे!”
त्यांच्या बोलण्यातली प्रामाणिकता आणि आत्मनिर्भरतेचा आवाज प्रत्येकाला प्रेरणा देतो.
मुलाच्या संसाराला आधार, समाजाला संदेश
“आत्ताची मुलं आईवडिलांना दमवतात कारण त्यांना इंग्रजी माध्यमांत घालावं लागतं, खर्च वाढतो. म्हणून मी ठरवलं की, माझ्या मुलाच्या संसाराला मदत व्हावी. मी रिक्षा चालवते आणि मला बरं वाटतं,”
असं त्या हसत सांगतात.
रस्त्यावर गाडी चालवताना इतर चालकही त्यांना मान देतात
“माझ्या बाजूने गाडी चालवणारे म्हणतात, ‘आजीला जाऊ द्या!’ हे ऐकून मन भरून येतं.”
समाजासाठी प्रेरणा
मंगला आवळे आजींच्या या धैर्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने केवळ कराडच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी दाखवून दिलं की, काम करणं ही लाज नाही, तर जगण्याची ताकद आहे.
त्यांचं हे उदाहरण प्रत्येक तरुणाने, प्रत्येक गृहिणीने आणि निवृत्तीनंतरही सक्रिय राहू इच्छिणाऱ्यांनी नक्कीच घ्यावं.
अशा आजींचा सन्मान समाजाने करायलाच हवा
आजच्या काळात जेव्हा अनेक जण नोकरीला कंटाळून अकाली निवृत्ती घेतात, तेव्हा मंगला आजींसारख्या महिलांनी दाखवून दिलं आहे की, खरी निवृत्ती मनाची असते, शरीराची नव्हे.


