
सातारा प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने कामाला लागावे, तसेच युतीतील घटक पक्षांवर टोकाची टीका टाळावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, डॉ. भागवत कराड, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राजू भोसले आणि सुनील काटकर आदी उपस्थित होते.
बैठकीत सातारा जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्याकडे सोपविण्यात आली. “जिथे शक्य आहे तिथे युतीचा प्रयत्न करावा. मात्र, स्वबळावर लढावे लागल्यासही घटक पक्षांवर टीका न करता सामोपचाराचे धोरण ठेवावे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांमधील समन्वय आणि “दोन्ही राजांचे मनोमिलन” या विषयावरही बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात दिवाळीनंतर धोरणात्मक निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
मागील निवडणुकीतील परिस्थिती, विद्यमान राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक रचना यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.