
संभाजीनगर प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ‘हंबरडा मोर्चा’तून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “हा हंबरडा मोर्चा नाही, हा इशारा मोर्चा आहे,” अशा शब्दांत ठाकरे यांनी सरकारला सज्जड दम भरला. शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
गुलमंडी येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले. “शिवभोजन थाळी बंद, आनंदाचा शिधा बंद, एक रुपयात मिळणारा पिक विमा बंद… २०१४ मध्ये मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. आज २०२५ आली, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याऐवजी घटलं. नुकसानभरपाई तरी द्या,” अशी मागणी ठाकरे यांनी केली.
‘मतचोरी’ आणि ‘महिलांच्या सन्मानाचा प्रश्न’
बिहार निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “मत मिळवण्यासाठी बिहारमध्ये महिलांना दहा-दहा हजार रुपये दिले. महिलांना मदत देण्यास आम्हाला विरोध नाही, पण देशभरातील महिलांना तितकीच मदत का दिली जात नाही? पीएम केअर फंडातून देशातील सर्व महिलांच्या खात्यात पैसे टाकण्याचं धाडस का दाखवत नाही? तुम्ही भाजपचे नाही, देशाचे पंतप्रधान आहात,” असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.
‘दोन्ही उपमुख्यमंत्री असंवैधानिक’
राज्यातील उपमुख्यमंत्रीपदांवरून ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. “हे सरकार विरोधी पक्षनेता नेमायला तयार नाही. म्हणे संविधानात तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्रीपद कुठं आहे संविधानात? असंवैधानिक पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री कसे? विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल, तर उपमुख्यमंत्रीपदही काढून टाका. आम्ही अशा पदांना मान्यता देणार नाही,” असा थेट इशारा ठाकरे यांनी दिला.
‘जनतेचा पाठिंबा आमच्याबरोबर’
सरकारवर ‘पाशवी बहुमताचा गैरवापर’ केल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, “पदं न दिली तरी हरकत नाही, कारण आमच्यापाठी जनतेचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेता पद नाकारून तुम्ही आम्हाला घाबरता हेच स्पष्ट होतं,” अशी टीका करत त्यांनी सभेतून सरकारला जोरदार धारेवर धरले.