
वृत्तसंस्था
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. मात्र, विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास संघाने ठाम नकार दिला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेत्यांना ट्रॉफी द्यायची होती. पण नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्री असून भारताविरोधात वादग्रस्त विधानं केल्यानेच भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचं स्पष्ट झालं.
TEAM INDIA CELEBRATING ASIA CUP VICTORY WITHOUT THE TROPHY…!!! pic.twitter.com/1g9qa5d2se
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2025
सामना संपल्यानंतर तब्बल सव्वा तास उशिरा प्रेझेंटेशन पार पडले. परंतु विजेतेपद मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ‘चॅम्पियन्स’ बोर्डासमोर एकत्र येत भन्नाट सेलिब्रेशन केलं. सूर्या दादाने हातात काल्पनिक ट्रॉफी धरल्यासारखं करत रोहित शर्माच्या अंदाजात एंट्री घेतली. त्यानंतर खेळाडू, कोच आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफसोबत जल्लोष रंगला. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, खेळाडूंनी विजेत्या संघाची पदकंही स्वीकारली नाहीत. मात्र, वैयक्तिक पुरस्कार मात्र खेळाडूंनी घेतले. अंतिम सामनावीर म्हणून तिलक वर्माची निवड झाली. तर कुलदीप यादवला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आलं. अभिषेक शर्माने ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ किताब पटकावत ट्रॉफीसोबत रोख बक्षीस आणि कार मिळवली.
भारतीय संघाने ट्रॉफी न स्वीकारता जल्लोष करत दिलेला संदेश हा क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाणारा ठरला आहे.