
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
तामिळनाडू: तामिळनाडूमधील करूर येथे शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचा सूर चढला आहे. या दुर्घटनेनंतर अभिनेता व टीव्हीके प्रमुख विजय यांनी मोठी घोषणा केली. रॅलीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही तत्काळ प्रतिसाद देत मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या दुर्घटनेत शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
शनिवारी विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (टीव्हीके) पक्षाने करूर येथे भव्य रॅली आयोजित केली होती. आयोजकांनी साधारण १० हजार लोकांच्या उपस्थितीची अपेक्षा धरली होती; मात्र तब्बल २७ हजारांहून अधिक लोक जमले. सकाळपासूनच विजयची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. उष्णता, भूक व तहान यामुळे अनेक जण त्रस्त झाले. विजय संध्याकाळी सातच्या सुमारास रॅलीला दाखल झाले. त्यानंतर भाषणादरम्यान अचानक अनेक लोक बेशुद्ध पडले आणि घबराटीच्या वातावरणात चेंगराचेंगरी झाली.
या घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यांनी राज्यपाल आर. एन. रवी व मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी संवाद साधत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व प्रकारची केंद्र सरकारकडून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवालही मागवला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व एआयएडीएमके सरचिटणीस के. पलानीस्वामी यांनी या घटनेबाबत सरकारवर टीकेची झोड उठवली. रॅलीतील सुरक्षेतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडली. पोलिस व प्रशासनाने खबरदारी घेतली असती तर मृत्यू टाळता आले असते. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घबराट पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. टीव्हीकेने आतापर्यंत चार रॅली घेतल्या आहेत. त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था पक्की करण्यास प्राधान्य द्यायला हवे होते,” असे पलानीस्वामी म्हणाले.
करूरमधील दुर्घटनेमुळे तामिळनाडूत हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.