
जालना प्रतिनिधी
जालना शहरात रविवारी उशिरा दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडवली. ओबीसी आंदोलक नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आंदोलकांनी हल्ला चढवला.
नीलम नगर भागातील ही घटना रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी असताना एक अज्ञात व्यक्ती हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. त्याने गाडीवर टाकलेल्या कव्हरवर सर्व बाजूंनी तो पदार्थ ओतला आणि नंतर गाडी पेटवली. आग लागल्याने कव्हर क्षणात जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाघमारे यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, याच दिवशी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरही हल्ला झाला. धनगर उपोषण आंदोलनाला जाणाऱ्या सदावर्ते यांच्या ताफ्यावर काही मराठा आंदोलकांनी हल्ला चढवला. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असतानाही आंदोलकांनी गाडीजवळ पोहोचून काच फोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोन-तीन आंदोलकांनी सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले. तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करून काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही घटनांमुळे जालन्यातील वातावरण तापले असून राज्यातील सामाजिक तणाव आणखी वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.