मुंबई प्रतिनिधी
बांद्रा (प.) येथील प्रसिद्ध बांद्रा तालाब ज्याला अधिकृतरीत्या स्वामी विवेकानंद सरोवर म्हटले जाते, हा परिसर एकेकाळी कुटुंबीय व मुलांच्या आनंदाचा केंद्रबिंदू होता. भाजप आमदार व मंत्री आशीष शेलार यांच्या प्रयत्नातून या सरोवराचे आकर्षक नुतनीकरणही झाले होते.
मात्र सध्या या ठिकाणी ड्रग्ज माफियांचा उच्छाद माजला आहे. तलाव परिसरात उघडपणे गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार वसीम, यासीन शेख, फरीदा आणि शबनम हे चौघे या अवैध धंद्यात सक्रिय आहेत. वसीम मोठ्या प्रमाणात नशेचा साठा आणून यासीनकडे देतो त्यानंतर यासीन लहान पाकिटे करून पत्नी फरीदा व शबनम यांच्या हाती सोपवतो. या दोघी आपल्या माध्यमांतून परिसरात विक्री करतात.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की,शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, तरुणी तसेच नशेखोर तलाव परिसरात येऊन सर्रास ड्रग्ज खरेदी करतात. यामुळे कुटुंबासह फेरफटका मारायला जाणेही कठीण झाले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी असे प्रकार घडणे अत्यंत लाजिरवाणे आहे.
दरम्यान या आरोपींवर पूर्वीही बांद्रा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील हा धंदा सुरूच असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांनी तात्काळ कठोर कारवाई करून तलाव परिसरातील शांतता व सुरक्षितता पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे.


