
संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पसरलेल्या सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. कोडेन फॉस्फेट या खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली तरुण-तरुणींना व्यसनाधीन करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ जणांना अटक केली असून ४१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत २,५०४ बाटल्या आणि सुमारे १२.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकासह गुन्हे शाखा व अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने संयुक्तरीत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर असलेल्या या रॅकेटचा शेवटी पर्दाफाश करण्यात आला.
एमआर ते पेडलर
या प्रकरणात अटकेत असलेले अविनाश, रूपेश आणि अमोल हे तिघेही मुळचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) होते. मात्र त्यांचे जीएसटी व औषधी परवाने रद्द झाल्यानंतर त्यांनी त्याच परवान्यांचा गैरवापर करून औषधांचा पुरवठा सुरू ठेवला. बनावट परवान्यांच्या साहाय्याने औषधी कंपन्यांकडून वेदनाशामक व गुंगी आणणारी औषधे मागवली जात होती. नंतर ही औषधे महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यसनी तरुणांपर्यंत दहापट किमतीत पोहोचवली जात होती.
शृंखलाबद्ध नेटवर्क
पोलिस तपासात या रॅकेटचे १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे जाळे असल्याचे समोर आले आहे. विविध औषधी दुकानं, एजन्सी चालक, डॉक्टरांच्या नावावरची कागदपत्रं, तसेच इतर चॅटिंग अॅप्स, दुसऱ्यांची बँक खाती व वाहनांचा वापर या सर्वांच्या माध्यमातून व्यवहार केल्या जात होते.
अजूनही उघडे प्रश्न
पोलिसांची कारवाई सुरू असली तरीही अशी औषधे व नशेच्या गोळ्या बाजारात सहज उपलब्ध होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास व्हावा, आणि संपूर्ण सिंडिकेट उद्ध्वस्त व्हावे, अशी अपेक्षा समाजात व्यक्त होत आहे.