
सातारा प्रतिनिधी
लोणंद | अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकाला लोणंद पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड करत स्कॉर्पिओसह ताब्यात घेतले. या चपळाईने केलेल्या तपासामुळे लोणंद पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
७ सप्टेंबर रोजी सायंकाळी लोणंद–फलटण मार्गावरील तरडगाव हद्दीतील उड्डाणपुलावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक पळून गेला होता.
तपासाच्या धाग्याला पकडत पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सदर गाडी महिंद्राची स्कॉर्पिओ असल्याचे निष्पन्न झाले. स्कॉर्पिओ (क्रमांक एचएम ४५ एझेड ४४४७) व चालक यशराज जितेंद्र घाडगे (२३, रा. नागठाणा, वेळापुर, जि. सोलापूर) यांची ओळख पटली. पोलिसांनी वेळापुरातून त्याला वाहनासह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोउनि रोहित हेगडे, उपनिरीक्षक विजय पिसाळ, हवालदार बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर व अमोल जाधव यांनी ही मोहिम यशस्वी केली.
अपघातानंतर पसार झालेल्या आरोपीचा माग काढून अवघ्या काही दिवसांत स्कॉर्पिओसह जेरबंद करणाऱ्या लोणंद पोलिसांच्या सतर्कता, दक्षता व धडाडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.