
सातारा प्रतिनिधी
सातारा | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा राज्यात अग्रभागी राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील लोककल्याणकारी योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांसह मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही ग्रामविकासाची मोठी चळवळ असून गावागावांत लोकसहभागातून ते यशस्वी करायचे आहे. गाव मजबूत व समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींना सक्षम करणे हा अभियानाचा उद्देश आहे.”
राज्यव्यापी अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबरपासून होणार असून चांगले काम करणाऱ्या गावे, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात अभियानाबाबतच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.