मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी नियोजित मेळाव्यासाठी महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असला तरी परवानगीसोबतच्या २५ अटींपैकी १६ वी अट ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
महापालिकेने दिलेल्या परवानगीपत्रात स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, “सदर दिवशी शासनाने किंवा महापालिकेने कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास ही परवानगी रद्द करता येईल.” या अटीमुळे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याभोवती अनिश्चिततेचे सावट आले आहे.
कोणत्या आहेत महत्त्वाच्या अटी?
* मैदानाच्या वापरासाठी दररोज रु. २५० + जीएसटी शुल्क अनिवार्य.
* उच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक.
* ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करणे बंधनकारक.
* पोलिस, अग्निशमन विभाग व स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक.
* रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम होऊ नये.
* मैदानाचे नुकसान झाल्यास २० हजारांची अनामत जप्त केली जाईल.
* कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ मैदान पूर्ववत करणे बंधनकारक.
* मैदानात अन्न शिजविण्यास सक्त मनाई.
याशिवाय, परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाल्यास पुढील वर्षी परवानगी नाकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
ठाकरेंची डोकेदुखी वाढली
दसरा मेळावा हा उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा आणि ताकदीचा वार्षिक उत्सव मानला जातो. पण, १६ व्या अटीमुळे – “परवानगी कधीही रद्द होऊ शकते” – या शक्यतेने आता ठाकरे गटाच्या तयारीवर गडद छाया पडली आहे.
राजकीय पातळीवर या अटींच्या राजकारणावर चर्चा रंगू लागली असून, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर याचे पडसाद पुढील काही दिवसांत उमटण्याची शक्यता आहे.


