
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | कफ परेड येथील न्यू नेव्ही नगरातील अत्यंत संवेदनशील व प्रतिबंधित परिसरातून इन्सास रायफल व जिवंत राऊंड चोरी करून पसार झालेल्या दोघा आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत गजाआड केले आहे. या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेली इन्सास रायफल, दोन मॅग्झीनसह एकूण ४० जिवंत राऊंड व एक रिकामी मॅग्झीन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश विसर्जनाच्या दरम्यान घडली. एपी टॉवर, नेव्ही नगर येथे ड्युटीवर असलेल्या जवानाजवळ एक अनोळखी इसम आला. त्याने स्वतःला QRT विभागातील असल्याचे सांगून लबाडीने जवानाकडील रायफल व मॅग्झीन ताब्यात घेतले आणि जवानाला ‘रिलीफ झाली आहे, हॉस्टेलवर जा’ असे सांगितले. मात्र थोड्याच वेळाने जवानाला आपले घड्याळ विसरल्याचे लक्षात आले. तो परतल्यावर तो इसम गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तवार्ता यांच्या आधारे आरोपी आसिफाबाद, तेलंगणा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी राकेश रमेश डुब्बुला (२२) आणि उमेश रमेश डुब्बुला (२५, दोघे रा. आसिफाबाद, तेलंगणा) यांना बेड्या ठोकल्या.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश बालकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.