डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली (पूर्व) येथील आयरे गावातील गावदेवी मंदिरात मंगळवारी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली. मंदिरातील दानपेटी फोडून तब्बल ३७ हजार ५१८ रुपयांची रक्कम चोरली गेली. विशेष म्हणजे, रामनगर पोलिसांनी केवळ चार तासांत आरोपीचा शोध घेत अटक केली.
संभाजी राम बिराजदार (२५, रा. तुकारामनगर, डोंबिवली पूर्व) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो आपल्या कुटुंबीयांसह शेवंती छाया इमारतीत राहतो. या तरुणाने लाल रंगाचा हुडी जॅकेट घालून, धारदार शस्त्राच्या मदतीने मंदिराचे कुलूप तोडले. त्यानंतर दानपेटी फोडून रक्कम चोरून नेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले.
बुधवारी सकाळी ग्रामस्थांना मंदिराचे दरवाजे आणि दानपेटीची तोडफोड झाल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापन समितीने पोलिसांत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे व उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातून आरोपीची हालचाल लक्षात आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने ओळख पटली.
यानंतर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन बिराजदारला अटक केली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली रिक्षा, चोरीस गेलेली रोख रक्कम असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुपडे, प्रसाद चव्हाण, मंगेश शिर्के, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत सरनाईक, नीलेश पाटील आदींचा सहभाग होता.
डोंबिवलीतील या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.


