
मुंबई प्रतिनिधी
बोरिवलीत केवळ नऊ महिन्यांच्या वैवाहिक जीवनानंतर एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी पती सागर रमेश नारगोलकर (३१) याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हिमानी सिंग या तरुणीचे सागरसोबत डिसेंबर २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील सिटी गार्डन हॉल येथे लग्न झाले होते. त्याआधी दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर हिमानी बोरिवलीतील आयसी कॉलनीत सासरी राहायला आली होती. परंतु विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वादविवाद सुरू झाले. सागर तिला क्षुल्लक कारणावरून वाद घालणे, मद्यप्राशन करून शिवीगाळ व मारहाण करणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
हिमानीचा सतत होणारा मानसिक व शारीरिक छळ सहन न झाल्याने ती नैराश्यात गेली होती. अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार उघड झाल्यानंतर हिमानीची आई राजेंद्रकुमारी सिंग यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सागरविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक व शारीरिक शोषण यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तत्काळ सागरला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.