
मुंबई प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावातील अवैध वाळू उत्खननाच्या कारवाईदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून पवारांवर टीका होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला आहे.
घडले असे की, डीएसपी अंजना कृष्णा आपल्या पथकासह कुर्डू येथे बेकायदेशीर उत्खननावरील कारवाईसाठी गेल्या असता ग्रामस्थांशी बाचाबाची झाली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. पवारांनीही कृष्णा यांच्याशी फोनवरून उग्र स्वरात चर्चा केली. हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांत आल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, “जे काही कायदेशीर करायचे होते, ते झाले आहे. अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेले आहे. पण खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर रिपोर्ट मागवला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.”
फडणवीस यांनी याचवेळी असेही स्पष्ट केले की, अनेकदा निवेदनांवर आधारित आदेश दिले जातात, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. अशा वेळी अधिकारी योग्य माहिती कळवतात आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो.
या संपूर्ण प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला दम दिला, याबाबत सरकारची भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.