
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील सर्वात लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा भक्तांची प्रचंड गर्दी उसळली. मात्र, या गर्दीत भुरट्या चोरांचेही फावले. विसर्जन सोहळ्यात तब्बल १०० हून अधिक मोबाईल तसेच सोनसाखळी चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत.
शनिवारी सकाळी मंडपातून मार्गस्थ झालेला लालबागचा राजा तब्बल ३५ तासांनंतर रविवारी रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास विसर्जित झाला. या दीर्घकाळ चाललेल्या मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला.
पोलिसांची माहिती
काळाचौकी पोलिस ठाण्यात १०० हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच सोनसाखळी चोरीच्या अनेक तक्रारींचीही नोंद झाली असून या प्रकरणी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन सोनसाखळ्याही हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, विसर्जनावेळी परवानगीशिवाय ड्रोन वापरणाऱ्यांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गर्दीचा गैरफायदा
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या. गर्दीत मोबाईल, दागिने खेचून पसार होणाऱ्या चोरट्यांना ओळखणे कठीण झाले. परिणामी विसर्जनाचा उत्साह अनेक भाविकांसाठी कडवट अनुभव ठरला.
विसर्जनाला विलंब का?
शनिवारी सकाळी १० वाजता निघालेला राजा रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचला. मात्र, त्यावेळी समुद्राला मोठी भरती आल्याने मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचणी निर्माण झाल्या. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या दुप्पट आकाराच्या तराफ्यावर मूर्ती बसवताना तांत्रिक अडथळे आले. सकाळी साडेनऊपासून सुरू असलेले प्रयत्न अखेर दुपारी साडेचार वाजता यशस्वी झाले. त्यानंतर भरती ओसरताच विसर्जनाची प्रक्रिया पार पडली.
अखेर ३५ तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राजाचे विसर्जन पूर्ण झाले. मात्र, या दरम्यान झालेल्या चोरीच्या घटनांनी अनेक भाविकांचा आनंद गालबोट लागला.