
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी १५व्या वित्त आयोगातून तब्बल ३९.८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंजुरीनंतर या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता. महावितरण कंपनीमार्फत सादर झालेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीने मान्यता दिली. त्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली.
या कामांमध्ये लोणंद पालिका हद्दीत भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी १२.२२ कोटी, महाबळेश्वर शहरात ८.०५ कोटी, पाचगणी शहरात ९.५५ कोटी आणि वाई शहरात भूमिगत वीजवाहिनी तसेच खांब उभारणीसाठी १०.०१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे साताऱ्यातील पर्यटनस्थळांना दर्जेदार वीजपुरवठा मिळण्याबरोबरच पावसाळ्यातील दुर्घटनाही टळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.