
सातारा प्रतिनिधी
सातारा – सातारा जिल्हा पोलीस दलाने हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल २४९१ मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून देत राज्यात आघाडी घेतली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलाला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला.
भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत (DoT) आयोजित वार्षिक सुरक्षा परिषदेत (Annual Security Conference for West Zone LSAs and LEAs) सातारा जिल्हा पोलीस दलाला ‘Certificate of Appreciation’ प्रदान करण्यात आले. गोव्यात ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या समारंभात हा सन्मान सोपविण्यात आला.
या कार्यवाहीसाठी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करून सातारा पोलिसांनी हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढले. यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाला असून जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.
सदर सन्मान स्वीकारताना जिल्हा पोलीस अधीक्षक सो. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली पाटील कडुकर, तसेच पोलीस निरीक्षक व संबंधित पथकातील अधिकारी उपस्थित होते.
या सन्मानामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाने हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेत केवळ आघाडी घेतली नाही, तर नागरिकांमध्ये विश्वासार्हता आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ केली आहे.