
मुंबई प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो बांधव राज्यभरातून आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
अंतरवाली सराटीहून सुरू झालेलं आंदोलन मुंबईत पोहोचलं आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन आंदोलकांचा आंदोलनावेळी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही आंदोलकांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. तर आज एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यानं त्याला वाचवण्यात यश आलं.
मुंबईत आझाद मैदानात शनिवारी आंदोलन सुरू असताना विजय घोगरे या लातूरच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी दोन दिवसांपूर्वी शिवनेरीवरही एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे आंदोलकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. यातच आता आणखी एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं खळबळ उडालीय.
सीएसएमटी स्थानकासमोरच आंदोलक तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी तिथं जवळच असणाऱ्या डॉक्टर दिलीप निकम यांनी तातडीनं आंदोलकावर उपचार केले. यामुळे आंदोलकाचा जीव वाचवण्यात यश आलं. दिलीप निकम हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून ते कॅन्सर विभागाचे प्रमुख आहेत. अचानक आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं इतर सहकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा जवळच असलेल्या डॉक्टर दिलीप निकम यांनी आंदोलकाचा जीव वाचवला.