
उमेश गायगवळे
मुंबई|वांद्रे येथील सरकारी वसाहतीत समाजकल्याण विभागाला महत्त्वाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने ४०० चौ. मी. क्षेत्रफळाची जागा प्रज्ञा सांस्कृतिक केंद्रासाठी मंजूर केली आहे. या ठिकाणी आधुनिक बुद्ध विहार तसेच सर्वसामान्यांसाठी वाचनालय उभारण्यात येणार आहे.
या निर्णयाची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, भाडेपट्टा करारानुसार ही जागा ३० वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र दराने उपलब्ध करून दिली जात आहे. “समाजकल्याण, सांस्कृतिक विकास आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी, यासाठी शासन वचनबद्ध आहे. वांद्रे वसाहतीतील ही जागा अशा उपक्रमांसाठीच उपयुक्त ठरणार आहे,” असे ते म्हणाले.
या निर्णयामुळे वांद्रे परिसरातील रहिवाशांना वाचन, अध्ययन व सांस्कृतिक कार्याची नवी दालनं खुली होतील. विशेषतः युवक व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध होणारे वाचनालय महत्त्वाचे साधन ठरणार आहे. बुद्ध विहाराच्या उभारणीमुळे बौद्ध समाजासह सर्वसामान्य नागरिकांसाठी अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र उभारणीमुळे वांद्रे परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनात नवा आयाम जोडला जाईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.