
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : सुप्रसिद्ध ज्वेलर्स चंदुकाका सराफ यांच्या नावावर जीएसटी सर्टिफिकेटचा गैरवापर करून सोन्या-हिऱ्यांचे दागिने ठकवणाऱ्या एका आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३१.५८ लाख रुपये किंमतीचा सर्व माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आंतरराष्ट्रीय हिरे परीक्षण संस्थेतून बोलत असल्याचे सांगत चंदुकाका सराफ यांचे जीएसटी सर्टिफिकेट फसवणुकीने मिळवले. त्यानंतर तोच सराफ असल्याचे भासवत अंधेरी आणि पुणे येथील ज्वेलर्सकडून दागिन्यांची ऑर्डर घेतली. मनी ज्वेल्स एक्सपर्ट (अंधेरी-पूर्व) येथून २७ लाख रुपये किंमतीचे दागिने बांद्रा येथे रस्त्यावर, तर कलीस्ता ज्वेलर्स (महाकाली केव्हज रोड) येथून ४.५८ लाख रुपये किंमतीचे दागिने पुण्यात घेण्यात आले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ६३३/२०२५ व ६३१/२०२५ दाखल झाले असून कलम ३१८(४), ३१९ भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान तांत्रिक आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.
सदर कारवाईत १०० टक्के मालमत्ता हस्तगत झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, उप आयुक्त दत्ता नलावडे, सहायक आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या देखरेखीखाली सपोनि यश पालवे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.