
सातारा प्रतिनिधी
सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत थेट गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करता गुन्ह्यांचा तपास प्रलंबित ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलिस दलात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आर. व्ही. पाटील आणि एस. ए. गावित अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी एक जण २०१५ ते २०१९ या काळात सातारा शहर ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्यांच्या जबाबदारीतील दोन गुन्हे, एक बेपत्ता व्यक्ती व सात मृत्यू प्रकरणे अपूर्ण राहिली आहेत. दुसरे कर्मचारी २०१८-१९ मध्ये शहर ठाण्यात कार्यरत होते. सध्या कराड शहर पोलीस ठाण्यातील सेवेत असलेले हे कर्मचारी सहा गुन्हे, सहा बेपत्ता प्रकरणे आणि तीन मृत्यू प्रकरणांचा तपास अपूर्ण ठेवून गेले आहेत.
वरिष्ठांकडून वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही दोघांनीही प्रलंबित तपास पूर्ण केला नाही. परिणामी बुधवारी सातारा शहर ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
“काही कर्मचारी बदली झाल्यानंतरही त्यांच्याकडे सोपविलेली प्रकरणे अपूर्ण ठेवतात. अशा प्रकरणांचा तपास न झाल्याने त्याचा फटका एकूण कामकाजावर बसतो. संबंधितांना वारंवार संधी देऊनही त्यांनी काम पूर्ण केले नाही. त्यामुळेच कठोर पाऊल उचलावे लागले,” असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.