सातारा प्रतिनिधी
राजधानी साताऱ्यात डॉल्बी संस्कृतीविरोधात ज्येष्ठ नागरिकांनी अनोखी चळवळ हाती घेतली आहे. शहरातील अनेक ज्येष्ठांनी भर पावसात क्रांतीची मशाल पेटवत डॉल्बीवर बंदीची मागणी केली. “एकदा निर्धार केला की तो पूर्णत्वास नेल्याशिवाय सातारकर स्वस्थ बसत नाहीत,” असे प्रतिपादन करत त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.
गेल्या काही वर्षांत कोणतीही मिरवणूक असो,धार्मिक, सांस्कृतिक वा राजकीय, डॉल्बी अनिवार्य झाल्यासारखा चित्र दिसते. परंतु डॉल्बीमुळे होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि झालेली मृत्यूची उदाहरणे याचा संदर्भ देत ज्येष्ठांनी या संस्कृतीविरोधात उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
“पूर्वीच्या मिरवणुकींमध्ये बँड, ढोल, लेझीम असायची; तेव्हाही उत्साह तितकाच होता. पण आज डॉल्बी हा एक ‘ब्रँड’ बनला आहे. तो ब्रँड अनेकांच्या आजाराला, काहींच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. मग अशा डॉल्बीची गरज तरी काय?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
गोल बागेपासून शिवतीर्थपर्यंत पावसात चालत जाऊन ज्येष्ठांनी मोर्चा काढला आणि निवेदन दिले. या चळवळीचा पुढचा टप्पा केवळ साताऱ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
“डॉल्बी हद्दपार करण्यासाठी आता लढा सुरू झालाय. हा लढा मध्येच थांबणार नाही; कारण आवाज वाढणार आहे आणि तो सर्वदूर ऐकू येणार आहे,” असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले.
या आंदोलनामुळे साताऱ्यात डॉल्बी संस्कृतीवर नवे वादंग पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.


