
सातारा प्रतिनिधी
कोयना धरणातून वाढलेला विसर्ग आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे पाटण तालुक्यातील हेळवाक गावात सोमवारी पूरस्थिती निर्माण झाली. गावातील मुख्य रस्त्यांवर तसेच अनेक घरांच्या आवारात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू आहे.
गावातील काही भाग जलमय झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे आठ फूटांवरून नऊ फूटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे कोयना नदीपात्रात तब्बल ६५,६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. त्याशिवाय धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट्स कार्यान्वित असून त्याद्वारे आणखी २१०० क्युसेक विसर्ग होत आहे. परिणामी, कोयना नदीत एकूण ६७,७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूरस्थिती लक्षात घेता बचाव पथकांची सज्जता वाढवण्यात आली असून नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मोहीम सुरू आहे.