
पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवारी दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कुंडेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविक महिलांनी भरलेली पिकअप वाहन अचानक रिव्हर्स येत पाच-सहा वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात तब्बल 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना पाईट परिसरातील डोंगर चढावावर दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. तिसरा श्रावणी सोमवार असल्याने परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. शेतकरी महिला व लहान मुलांचा समावेश असलेला सुमारे 25 ते 30 जणांचा ताफा कुंडेश्वर मंदिराकडे जात असताना, नागमोडी चढावावर पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. पिकअप अचानक मागे घसरत गेली आणि भीषण दुर्घटनेत दरीत कोसळली.
अपघातानंतर परिसरात हाहाकार माजला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, प्रशासनाकडून रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने काही जखमींचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याची माहिती मिळते. जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. “या दुर्घटनेत 8 ते 9 महिलांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. शक्य ती सर्व मदत केली जाईल,” असे आमदार काळे यांनी सांगितले.
या भीषण घटनेने खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. श्रद्धाळूंच्या आनंददायी यात्रेचे रूपांतर क्षणात शोकांतिकेत झाले.