
पुणे प्रतिनिधी
कात्रज-नवले रस्त्यावर भररस्त्यात झालेल्या ४० लाखांच्या लुटीचा धक्कादायक उलगडा झाला असून, संबंधित व्यावसायिकाच्या जवळच्या मित्रानेच ही लूट आखल्याचं समोर आलं आहे. अवघ्या २४ तासांत आंबेगाव पोलिसांनी गुन्ह्यातील दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
व्यवसायिकाचा पाठलाग गावापासून पुण्यापर्यंत!
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथून व्यावसायिक अभिजित विष्णू पवार (वय ३२) पुण्यातील व्यवहारासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा जुना मित्र मंगेश दीपील ढोणे (रा. हडपसर, मूळ रा. येडशी) होता. मात्र याच मित्राने प्रवीण डोईफोडे (रा. इंगळेनगर, भुगाव) यांच्यासह कट रचून पुणे शहरात लुट घडवून आणली.
फारच नियोजनबद्ध लूट
अभिजित पवार हे सकाळी सहाच्या सुमारास हडपसर गाडीतळ येथे पोहोचले. नंतर ढोणेच्या आयशर वाहनाने ते आंबेगाव येथे आले. ढोणेने रोकडची बॅग स्वतःकडे घेतली. ते पायी चालत असतानाच, आधीपासून नियोजित थार गाडीमधून आलेल्या चोरट्यांनी बॅग हिसकावली आणि पळ काढला. पवार यांनी प्रतिकार करत गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने त्यांच्या तोंडावर ठोसा मारत त्यांना खाली पाडलं. चोरटे तत्काळ पसार झाले.
मित्रावरच संशय, तपासात उलगडा
पोलिसांनी सुरुवातीपासूनच ढोणेवर लक्ष केंद्रित केलं. कारण चोरट्यांनी पवार यांना मारहाण केली, पण ढोणेला काहीही इजा झाली नव्हती. तांत्रिक विश्लेषणातही ढोणेची धाराशिवमधील संशयित व्यक्तींशी सातत्याने संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जबरदस्तीत झडती घेतल्यानंतर ढोणेने गुन्ह्याची कबुली दिली.
प्रमुख आरोपी अटकेत; फरारांचा शोध सुरू
आत्तापर्यंत प्रवीण डोईफोडे आणि मंगेश ढोणे यांना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
“व्यवसायिकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, मित्रानेच लुटीचा कट रचला होता. ही घटना मैत्रीच्या नात्यावर काळी छाया टाकणारी आहे.”
— शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलिस ठाणे
ही घटना मैत्रीतून गुन्हेगारीकडे झुकलेल्या वृत्तीचं उदाहरण ठरत असून, पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी लूट उघडकीस आली आहे.