
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई – राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह एका भारतीय महिलेला अटक केली आहे. ही महिला नुकतीच कतारमधील दोहा येथून मुंबईत दाखल झाली होती.
गुप्त माहितीनुसार, ही महिला मोठ्या प्रमाणावर मादक पदार्थ घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, महिला विमानतळावर आल्यानंतर तिच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना तिच्या बॅगेत ठेवलेल्या बिस्किट व चॉकलेटच्या डब्यांमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या.
या डब्यांमध्ये अत्यंत कुशलतेने लपवण्यात आलेले तब्बल ३०० कॅप्सूल आढळले, ज्यामध्ये उच्च प्रतीचा कोकेन भरलेला होता. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ६२ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
चौकशीत संबंधित महिलेनं कबूल केलं की, ती हे ड्रग्ज दोहामधून मुंबईत तस्करी करून घेऊन आली होती. ही तस्करी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचंही तिने मान्य केलं.
सध्या संबंधित महिलेला NDPS कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहे, याचा शोध घेण्यासाठी DRI टीम तपासाचा विस्तृत धागा उलगडत आहे.
ही कारवाई देशात वाढत असलेल्या मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात एक मोठी कामगिरी मानली जात आहे. यावरून ड्रग माफियांकडून भारतासारख्या देशांमध्ये तस्करीसाठी कशा प्रकारच्या नव्या युक्त्या वापरल्या जात आहेत, हेही स्पष्ट होतंय.