मुंबई प्रतिनिधी
डोंबिवली | मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात महिलांच्या दागिन्यांचे स्नॅचिंगचे प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अँटी-चेन स्नॅचिंग पथक तयार करून नाकाबंदी आणि गस्त मोहीम राबवण्यात आली होती.
२३ जून आणि ९ जुलै रोजी झालेल्या घटनांनंतर वेध लागला आरोपीकडे
२३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता दावत हॉटेल, ९० फुटी रोडजवळ एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली होती. तर ९ जुलै रोजी ठाकुर्ली येथे सौ. मंजू अनिल शहा (वय ६३) यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची, सुमारे १.८० लाखांची साखळी दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून येत हिसकावली होती. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१७२ सीसीटीव्ही फुटेजची छाननी करून आरोपीला अटक
तपास अधिक कठीण होण्यामागे आरोपीचे प्रत्येक वेळी वाहन बदलणे हे कारण होते. मात्र, डोंबिवली पोलिसांच्या तपास पथकाने तब्बल १७२ सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक व भौगोलिक माहितीच्या आधारे कल्याण पश्चिम येथील परेश किशोर घावरी (वय ३५) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या आरोपीकडून २० ग्रॅम आणि १० ग्रॅम वजनाच्या अनुक्रमे १.८० लाख व ९० हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या, पल्सर दुचाकी (एमएच-०५/एफएस ९६५६) – १.१५ लाख रुपये, यामाहा स्कुटर (एमएच -०५/एफवाय – १४७०) – १.७० लाख रुपये असा एकूण ५.५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांत समाधान
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सपोनि बळवंत भराडे, पोउनि प्रसाद चव्हाण, पोउनि गोरखनाथ गाडेकर, तसेच कर्मचारी सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, निलेश पाटील, देविदास पोटे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे डोंबिवली परिसरात नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढला असून, डोंबिवली पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.


