
मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्व तयारीचा धडाका सुरू केला असून, येत्या १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्हे बैठकीत सहभागी
राज्यातील ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषद, ४२ नगरपंचायत आणि २९ महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुंबई व उपनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
६ मुद्द्यांचा सखोल आढावा
या बैठकीत पुढील मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा होणार आहे:
* स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक घेण्याची तयारी
* प्रत्येक संस्थेतील मतदारांची अद्ययावत संख्या
* मतदान केंद्रांची आखणी व सुविधा
* ईव्हीएम (EVM) – उपलब्ध यंत्रांची संख्या, स्थिती आणि तपासणी
* मनुष्यबळाची उपलब्धता आणि आवश्यकतेनुसार नियोजन
* विलंबाने उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा पूर्वानुमान
राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्तांना पत्र लिहून या बैठकीत उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
ईव्हीएम तपासणी आणि सुरक्षा हाच बैठकीचा प्रमुख मुद्दा
ईव्हीएम यंत्रांची प्राथमिक तपासणी (FLC), गोडावूननिहाय स्थिती, कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) आणि DMM याबाबतची सविस्तर माहिती ९ जुलैपर्यंत आयोगाकडे PDF स्वरूपात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंत्रांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थांचा आढावा घेत नवीन खरेदीसाठी लागणारी जागा देखील ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मास्टर ट्रेनर्सचा डेटा मागवला
ईव्हीएम प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्सची उपलब्धता तपासून, जर ती अपुरी असेल तर अतिरिक्त प्रशिक्षकांची यादी सादर करावी, अशी सूचना दिली आहे.
मनुष्यबळाची मागणी आवश्यक असल्यास तात्काळ करा
निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचार्यांची संख्या तपासून ती अपुरी असल्यास, विभागीय आयुक्तांकडे तातडीने लेखी मागणी करावी, असेही आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे.
संपूर्ण राज्यात निवडणूक तयारीला वेग
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या हालचालींनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या शक्यतेला बळ मिळालं असून, राजकीय पक्षांमध्येही हालचालींना सुरुवात झाली आहे.
१० जुलैच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीची लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.