
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बीकेसी येथील सिटी पार्कच्या मागील रस्त्यावर मागील काही दिवसांपासून आजगरांची पिल्ले वारंवार आढळत असून, या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२९ जून रोजी दुपारी सफाई कर्मचारी रस्ता झाडताना त्याला काही पिल्ले रेंगाळताना दिसली. त्याने तात्काळ वनविभागाला माहिती दिली. यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे, दक्ष बेरेडिया तसेच माहीम पोलीस वसाहतीतील पोलीस हवालदार व सर्पमित्र सचिन मोरे यांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली.
तपासणीदरम्यान परिसरात पिल्लांची संख्या मोठी असल्याचे लक्षात आले. याच ठिकाणी २५ जून रोजीही १० आजगरांची पिल्ले पकडण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा पिल्ले रस्त्यावर दिसू लागली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मोहिमेत १४ पिल्ले सुरक्षित रेस्क्यू करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार मुरलीधर जाधव यांनीदेखील एका पिल्ल्याचे रेस्क्यू केले.
तपासणीदरम्यान एक पिल्लू वाहनाखाली येऊन मृतावस्थेत सापडले. गेल्या चार दिवसांत सिटी पार्क आणि सेवाभवनच्या मागील रस्त्यावर एकूण ५७ बिनविषारी आजगरांची पिल्ले सापडल्याची माहिती वन विभागाला दिली.
गेल्या काही दिवसांत समुद्राला उधान आल्याने आणि मीठी नदी शेजारील गटारांमध्ये पाणी साचल्यामुळे या सापांची पिल्ले बाहेर पडत असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोस्टल रोड आणि समुद्रकिनारी सुरू असलेल्या विकासकामांमुळेही असे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे.
सध्या सापांची पिल्ले अंड्यातून बाहेर येण्याचा काळ सुरू असल्याने नागरिकांनी घाबरू नये, तसेच वाहन रस्त्यावर किंवा ओलसर जागी पार्क करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कुठलाही साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असेही अधिकारी म्हणाले.