
सातारा प्रतिनिधी
सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळेच्या आधुनिक पुनर्बांधणीला शासनस्तरावरून मंजुरी मिळाली असून, या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
या कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सातारा बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र असून, येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची व प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्गांची आवश्यकता असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही खासदार उदयनराजे यांनी दिल्या.
मध्यवर्ती इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर वाहनांसाठी तसेच दिव्यांग प्रवाशांच्या सुलभतेसाठी रँप तयार करण्याचे निर्देश सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना देण्यात आले आहेत.
काम सुरू असताना प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बस स्थानक शेजारी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती खासदार उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे केली. दोन्ही कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, सातारा विभागाचे विभाग नियंत्रक विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय अभियंता प्रियांका काशिद, सातारा आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, तसेच सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आदी मान्यवर उपस्थित होते.