
मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘प्रमुख नेते’ म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या निवडीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी भावनिक भाषण करत एकीकडे कार्यकर्त्यांवर प्रेम व्यक्त केलं, तर दुसरीकडे पक्षातील आमदारांना थेट आणि स्पष्ट शब्दांत तंबी दिली.
“पद नको, कार्यकर्ताच हवं!”
शिंदे म्हणाले, “माझ्यासाठी कोणतेही पद महत्त्वाचे नाही. मी एक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांचा लाडका भाऊ आहे, हेच माझं खऱ्या अर्थाने मोठं पद आहे. पदं येतात आणि जातात, पण आपली ओळख कायम राहिली पाहिजे.”
शिवसेनेत ‘पक्षप्रमुख’ पदावरून चर्चा सुरु असून काहींनी ‘राष्ट्रीय प्रमुख’ पदाचीही मागणी केली आहे. यावर निर्णय पुढील बैठकीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“चुकीच्या विधानामुळे यश धोक्यात येऊ शकतं!”
पक्षातील काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत शिंदे यांनी ठाम शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “तुमच्या एका चुकीच्या विधानामुळे पक्षावर संकट ओढवू शकते. अनेकदा आपण मेहनतीने मिळवलेलं यश क्षणात नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी बोला, जास्त काम करा – हीच आपली कार्यसंस्कृती आहे.”
तसेच, “शब्द ही तुमची जबाबदारी आहे, ते पक्षाची प्रतिमा घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. विरोधकांना उघड करताना स्वतःच उघडे पडू नका,” असा टोकाचा इशाराही त्यांनी दिला.
“शिस्तीवर कुठलाही प्रश्न नको!”
“शिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. तुमच्या कृती माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज व्हायला हव्यात,” असं सांगत शिंदे यांनी आमदारांना सजग राहण्याचा आदेश दिला.
मराठी अस्मिता आणि भाषेसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा गौरव करत ते म्हणाले, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मराठी भाषा भवन, जागतिक मराठी साहित्य संमेलन अशा योजना राबवल्या जात आहेत. मराठीसाठी कोणतीही तडजोड मान्य नाही.”
“शिवसेना होणार अधिक लोकशाहीवादी – निवडणुकीतून ठरेल नेतृत्व”
शिंदे यांनी पक्षाच्या आगामी लोकशाही प्रक्रियेबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली. शाखाप्रमुख ते मुख्य नेते या सर्व पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, फक्त सक्रिय सदस्यांनाच मतदानाचा अधिकार असेल. “ही प्रक्रिया सात टप्प्यात, थेट आणि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल. कोणतेही नेतृत्व लादले जाणार नाही. पारदर्शकता आणि समानता हाच आपला पाया असेल,” असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
“एकजुटीने लढा – जिंकण्याची क्षमता असलेल्यालाच उमेदवारी”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सूचना दिल्या. “फक्त लायक उमेदवारालाच संधी द्या. मतदारांची नोंदणी वाढवा. शाखा हाच पक्षाचा आत्मा आहे, बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी ती बळकट केली होती. कंटेनर शाखा संकल्पना अमलात आणा,” असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
शेवटी शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करत म्हटलं, “नेता होण्याआधी एक कार्यकर्ता व्हा. पक्ष एका व्यक्तीवर उभा राहत नाही, तर कार्यकर्त्यांच्या आधारावर उभा राहतो. कार्यकर्त्यांना पुढे आणणं हेच खऱ्या अर्थाने नेतृत्व आहे.”