
मुंबई प्रतिनिधी
२००६ च्या मुंबई स्थानक बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि कट्टर दहशतवादी संघटना सिमी व आयसिसशी संबंधित असलेला साकीब नाचन याचा मृतदेह आज रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईतील जेजे रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या अंत्यविधीची तयारी पडघ्यात सुरू असून, उद्या (सोमवार) सकाळी १० वाजता त्याला पडघ्यातील कब्रस्तानात दफन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पडघा शहरात सुरक्षा कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
साकीब नाचन याचा मृत्यू दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय रुग्णालयात शनिवारी ब्रेन स्ट्रोकमुळे झाला. नाचन हा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक कट्टर कट रचणाऱ्या टोळ्यांचा म्होरक्या मानला जात होता.
दरम्यान, साकीब नाचनचा मुलगा शामील नाचन याला देखील आयसिस मोड्युल प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, वडिलांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला विशेष परवानगी दिली आहे.
साकीब नाचनने आपल्या काळात मुंबईत आणि ठाणे परिसरात अनेक धर्मांध आणि हिंसक कट रचले होते. त्याच्या मृत्यूमुळे एक दहशतवाद्याचा शेवट झाला असला, तरी त्याच्या विरुद्धची कट्टरता आणि त्याचे परिणाम आजही समाजात धगधगत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवा टाळण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.