
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी दिलासादायक आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा जून महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मोठी घोषणा करत ३६०० कोटी रुपयांची थेट बँक खात्यात (डीबीटी) वर्गवारी केली गेल्याची माहिती दिली. त्यामुळे आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पडण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलावर्गात मोठा आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्तरीत्या ही माहिती दिली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध — अजित पवार
अजित पवार म्हणाले, “महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली असून तिच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. योजनेच्या पुढील टप्प्यासाठी ३६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.”
गेल्या काही दिवसांपासून जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या लाभार्थी महिलांसाठी हा दिलासा ठरला आहे. यापूर्वी दावा करण्यात आला होता की, उशीर झाल्यामुळे जून व जुलै दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येतील. मात्र, सध्या तरी फक्त जून महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
११ हप्त्यांचे यशस्वी वितरण; योजना ठरली लोकप्रिय
जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. आतापर्यंत राज्यातील महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे २०२५ या अकरा महिन्यांचे हप्ते वेळोवेळी मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
राज्य सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे की ‘लाडकी बहीण’ योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर ती सातत्याने सुरू राहणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत असून, भविष्यातही नियमित निधी वितरण सुनिश्चित केलं जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.