
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या शिक्षण धोरणाने पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदीचा वाद पेटवला आहे. रविवारी आझाद मैदानात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या जीआरची होळी करत विरोधाचा भडका उडवण्यात आला. ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची!’ अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेलं!
महायुती सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार इयत्ता पहिली ते चौथीमध्ये ‘हिंदी’ ही अनिवार्य भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी जोरदार विरोध केल्यानंतर सरकारनं पवित्रा बदलला, मात्र हिंदीला ‘पर्यायी भारतीय भाषा’ म्हणून पर्याय दिल्याने वाद अधिकच पेटला.
या निर्णयाचा निषेध करत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि मनसेचे नितीन सरदेसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत आझाद मैदानात प्रत्यक्ष शासन आदेशाची होळी केली.
“सरकार हिंदी लादतेय, आम्ही ती झटकतो!” असा स्फोटक इशारा यावेळी ठाकरे गटाने दिला.
‘जीआर’ जळाला पण रोष वाढला!
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ही होळी करण्यात आली असली, तरी राज्यात या मुद्द्यावरून चांगलाच राजकीय खवळा उठला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जरी स्पष्ट केलं की, “हिंदी सक्ती नाही, तर विद्यार्थ्यांना पर्याय!” — तरी विरोधकांचा आरोप आहे की “हिंदी फक्त पर्याय नसून शाळांवर जबरदस्ती आहे.”
मराठीसाठी शिवसेना-मनसे एकत्र!
या आंदोलनात मनसे व ठाकरे गट एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही प्रत्यक्ष एकत्र न आले असले तरी त्यांचे कार्यकर्ते एका मंचावर जमले, हे लक्षात घेण्याजोगं आहे.
हिंदी-मराठी वादाची ही नांदी आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग असू शकते, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मराठी अस्मितेच्या नावावर शिवसेना आणि मनसे पुन्हा एकत्र येणार? हा खरा प्रश्न आहे!