
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
या आंदोलनाची नोंद घेत मोर्चाला विरोध करणाऱ्या वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. “सदावर्ते याला मराठी माणूस जाम चोपेल. भाजपने त्याच्या तोंडावर पट्टी बांधावी, नाहीतर दात उरणार नाहीत,” अशा संतप्त शब्दांत मनसे नेते अविनाश जाधव यांनी इशारा दिला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधत, स्वतंत्र मोर्चे काढण्याऐवजी एकत्रितपणे ‘मराठी स्वाभिमानासाठी’ एकच ऐतिहासिक मोर्चा काढण्याचे आवाहन केल्याची माहितीही जाधव यांनी दिली.
सदावर्ते यांनी या मोर्चाचा विरोध करत राज ठाकरे भाषिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. यावरून मनसेने तीव्र प्रतिक्रिया दिली. “सदावर्ते हा भाजपचा पाळलेला माणूस आहे,” असा आरोप करत, “त्याने याआधीही सिद्धिविनायक मंदिराच्या मुद्द्यावर उडी घेतली होती,” असेही जाधव म्हणाले.
“तुला एवढी अक्कल आहे ना, तर जा साऊथमध्ये आणि तिकडे अशा गोष्टी बोलून दाखव. मुंबईत याला घराबाहेर पडू देणार नाहीत. मराठी माणूस याला एक दिवस नक्की चोपेल,” असा थेट इशारा जाधव यांनी दिला.
हिंदी सक्तीमुळे लहान मुलांच्या भाषिक विकासावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत जाधव म्हणाले, “माझा मुलगा चौथीत आहे. सध्या तो मराठी-हिंदी मिसळून बोलतो. हे मुलांच्या मेंदूवर परिणाम करणारे आहे.”
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले, “हे सगळं दिल्लीचे मनसुबे राबवण्यासाठी चाललंय. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही.” यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचीही नावे घेऊन टीका केली.
“तबला, स्विमिंगसारख्या गोष्टी स्कोअरिंग असू शकतात. मग एखादी भारतीय कला, संगीत, नाट्यविषयक भाषा का नाही? हिंदीच का लादली जाते आहे?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता, असे जाधव यांनी सांगितले.
५ जुलैचा मोर्चा केवळ सुरुवात असून, पुढे अजून तीव्र आंदोलन होईल आणि सरकारने त्यासाठी सज्ज राहावे, असा इशाराही जाधव यांनी दिला.