
मुंबई प्रतिनिधी
मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या हालचालींना आता अधिकृत रंग चढताना दिसत आहे. ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईत दादर येथील ‘जिप्सी’ रेस्टॉरंटमध्ये महत्त्वपूर्ण भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानाजवळच असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दोघांनी बाकड्यावर बसून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले.
“राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात केलेल्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. एकाच विषयावर वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित, भव्यदिव्य मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. आजची ही भेट हा त्याच नियोजनाचा भाग आहे. केवळ राजकारणासाठी नव्हे, तर मराठीसाठी हे एकत्र येणे आहे,” असे सरदेसाई म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “५ जुलैच्या मोर्चाविरोधात काही मराठीविरोधी कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवून देऊ. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक आहेत.”
संदीप देशपांडे यांनीही या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “ही भेट ५ जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाच्या प्राथमिक चर्चेसाठी होती. यापेक्षा मोठ्या राजकीय युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, मुंबईत मोर्चा काढायला कुणीही बंदी घालू शकत नाही. मराठी माणसे एकत्र आली तर ते काही लोकांना नक्कीच खटकेल.”
या ऐतिहासिक भेटीनंतर स्थानिक पातळीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही समन्वय आणि संवाद वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया अधिक ठोस होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
५ जुलैचा मोर्चा आता केवळ मनसेचा नाही, तर तो मराठी जनतेचा आवाज ठरणार, यात शंका नाही!