
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे परिसरातील महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयातील गंभीर अनियमितता अखेर उघडकीस आली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आणि ‘मुंबई मिरर’मधील धक्कादायक वृत्तानंतर आज शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वरुण सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांसह अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल १६ कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट असतानाही अनेक ठिकाणी छताची गळती सुरूच असल्याचे चित्र आमदार सरदेसाई यांच्या पाहणीत दिसून आले. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “इतका मोठा खर्च करूनही दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. यामागे गंभीर अनियमितता आहे.”
तसेच, गेल्या एक वर्षापासून मूलभूत वैद्यकीय तपासण्या – जसे की रक्त, लघवी व विष्ठा तपासणी – पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णांना मजबुरीने महागड्या खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप सरदेसाईंनी केला.
रुग्णालयात आवश्यक असलेल्या वैद्यकीय यंत्रसामग्रीबाबतही दुटप्पी स्थिती दिसून आली. 2D Echo मशीन असतानाही ते चालवण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध नाहीत, अशी माहिती पाहणीत पुढे आली.
याशिवाय, रुग्णालयातील आवश्यक पदांपैकी केवळ ५० टक्केच पदे भरलेली असून, उर्वरित पदे रिक्त असल्याने रुग्णसेवा ठप्प झाली आहे, अशी खळबळजनक माहितीही पुढे आली. परिणामी रुग्णांना अपुर्या सेवा, अधिकचा खर्च व प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
“महापालिका आणि सरकार आरोग्य व्यवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. करदात्यांचा पैसा कुठे जातोय, हे कोणतंही उत्तर नसलेलं कोडं बनलं आहे,” अशी घणाघाती टीका आमदार सरदेसाई यांनी केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या प्रशासनावर तसेच ठेकेदारांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.