
मुंबई प्रतिनिधी
२६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे शहरात विशेष जनजागृती पंधरवडा राबवण्यात आला. १२ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप आज वाहन रॅली व पथनाट्य सादरीकरणाद्वारे करण्यात आला. या उपक्रमांमधून १५,२०० नागरिकांपर्यंत प्रभावी जनजागृती पोहोचवण्यात आली.
मुंबईतील मालवणी, कांदिवली, बोरीवली, कस्तुरबा मार्ग, समतानगर, कुरार आणि दिंडोशी भागांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘अंमली पदार्थांपासून दूर रहा’ अशा आशयाचे बॅनर व स्टिकर्स वाहनांवर झळकले. यामध्ये १५० ते २०० विद्यार्थ्यांसह ५० स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले.
शैलेंद्र महाविद्यालयाचे एनएसएस स्वयंसेवक, ‘अभिजीत प्रोडक्शन’ व ‘एरोजी’ या संस्थांनी पथनाट्याद्वारे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले.
या पंधरवड्यादरम्यान, पाच डि-अॅडिक्शन सेंटरना भेटी देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधण्यात आला. रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय परिसरात स्टिकर्स व पत्रक वाटून जनजागृती करण्यात आली.
शहरातील ४० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांत ४५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या अभियानाला पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यात विविध युनिटप्रमुख व अधिकारी – शशिकांत जगदाळे (कांदिवली), राजेंद्र दहिफळे (आझाद मैदान), संतोष साळुंखे (वरळी), अनिल ढोले (घाटकोपर), विशाल चंदनशिवे (बांद्रा) आणि बाळासाहेब शिंदे (प्रशासन) यांनी समन्वय साधला.
मुंबई पोलिसांचा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला असून, अशा प्रयत्नांमुळेच अंमली पदार्थविरोधी लढ्याला व्यापक जनसमर्थन मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.