
मुंबई प्रतिनिधी
चेंबूरहून सांताक्रुझमार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग गाठणे आता अधिक सोपे होणार आहे. एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) प्रकल्पाच्या विस्तारीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा, वाकोला नाला ते पानबाई शाळा या उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, केबल स्टे पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अमर महल जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सिग्नलमुक्त आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत शक्य होणार आहे. परिणामी वाकोला, सांताक्रुझ आणि अंधेरी परिसरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळेल.
प्रकल्पात देशातील अनोखा केबल स्टे पूल
या प्रकल्पात देशातील पहिल्या १०० मीटर तीव्र वळणाच्या केबल स्टे पुलाचा समावेश आहे. हा पूल २१५ मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकवर उभारण्यात आला असून, पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलावरून जातो. जमिनीपासून तब्बल २५ मीटर उंच असलेल्या या पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरले होते. सध्या पुलाखालील तात्पुरते आधार काढणे, रंगरंगोटी, पथदिवे, सौंदर्यीकरण आणि माहिती फलक लावण्याची कामे सुरू आहेत.
कामात विलंब, पण आता शेवटच्या टप्प्यात
या रस्त्याचे काम सुरुवातीला नियोजित वेळेत पूर्ण होणार होते. मात्र केबल स्टे पुलाच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे आणि कामाच्या संथगतीमुळे काहीसा विलंब झाला. या विलंबामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. आता मात्र काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. त्यांनी बुधवारी प्रकल्पस्थळी भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा
कपाडिया नगर ते वाकोला या ३.०६ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचा बराचसा भाग पूर्वीच वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता उर्वरित १.०२ किमी वाकोला नाला ते पानबाई शाळा मार्गिकेचे काम पूर्ण होत असल्याने संपूर्ण प्रकल्पाचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.
जुलैमध्ये रस्ता खुला होण्याची शक्यता
एमएमआरडीएने अद्याप या रस्त्याच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या या प्रकल्पाची प्रतीक्षा आता शेवटच्या वळणावर आली आहे!