
मुंबई, प्रतिनिधी
पवई, तुळशी आणि विहार या महत्त्वाच्या तलावांमधील गाळ काढण्यासाठी येत्या तीन महिन्यांत सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बुधवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हा आदेश दिला.
दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस पवई तलाव भरून वाहतो. मात्र यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच तलाव भरल्याने पर्यावरणवाद्यांनी गाळ साचल्यामुळे जलधारण क्षमतेवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील, पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पवई तलावातील प्रदूषणाबाबत ‘मेरी’ या संस्थेने केलेल्या अहवालाची माहिती देण्यात आली. ५५७ एकर क्षेत्रफळ असलेल्या या तलावात परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने जलपर्णीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सांडपाणी रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गाळ काढण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) वापरण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री शेलार यांनी दिली. तसेच, गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व साठवणुकीसाठी स्वतंत्र अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखड्यात समाविष्ट करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या जलस्रोतांचा दीर्घकालीन उपयोग सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत बैठकीनंतर व्यक्त करण्यात येत आहे