
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट ही निवडणूक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे यांच्याकडे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व – या दोन बळांवर शिंदे गटाने निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे एकमेकांसमोर ठाकणार, अशी राजकीय समीकरणं तयार होत आहेत.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज ‘मातोश्री’वर माजी नगरसेवकांची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत मनसेसोबत युती करण्याबाबत माजी नगरसेवकांशी चर्चा करण्यात आली असून, बहुतेकांनी युतीस अनुकूलता दर्शवली आहे.
मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवायचा असल्याने दोन्ही गटांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणाऱ्या या थेट लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.