
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा मोठा निर्णय राज्यसरकारने घेतला असून, आता वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत होती. ही सलग तिसरी मुदतवाढ असून, आता अधिक विलंब केल्यास कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात हे प्लेट लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, अजूनही अनेक वाहनधारकांकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अंतिम संधी देत सरकारने ही मुदत वाढवली आहे.
काय आहे ‘एचएसआरपी’?
वाहनांच्या चोरीला आळा घालण्यासाठी आणि ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ लागू करण्यात आली आहे. ही प्लेट अॅल्युमिनियमपासून बनवलेली असून, त्यावर खास कोडेड स्टिकर आणि रिव्हेट्स लावले जातात. त्यात वाहनाची तपशीलवार माहिती असते. २०१९ नंतरच्या सर्व नव्या वाहनांना ही प्लेट डीलरमार्फतच बसवण्यात येते. मात्र, २०१९ पूर्वीची वाहने ही बाब पूर्ण करत नसल्याने आता ती सर्वांना बंधनकारक करण्यात आली आहे.
दंडाची तरतूद काय?
एचएसआरपी लावणे बंधनकारक असूनही नियमाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनधारकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळेच ही अंतिम मुदत मानून वाहनधारकांनी त्वरित आपल्या वाहनावर एचएसआरपी बसवून घेणे गरजेचे आहे.
सरकारचा इशारा “ही शेवटची संधी मानावी”
राज्य सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, १५ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे ही शेवटची संधी मानत नागरिकांनी विलंब न करता जवळच्या अधिकृत एचएसआरपी केंद्राशी संपर्क साधावा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.