
मुंबई प्रतिनिधी
UPI ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनणार आहे. आजपासून म्हणजेच १६ जूनपासून UPI व्यवहारांमध्ये मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून करण्यात आलेल्या या सुधारणा सर्व वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
UPI प्रणालीत नवे बदल नेमके काय?
NPCI ने UPI सिस्टीमचे तांत्रिक स्वरूप अपग्रेड केले असून, यामुळे व्यवहारांची गती ६६ टक्क्यांनी वाढणार आहे. पेमेंट अयशस्वी होणे किंवा परतफेड होण्यासाठी लागणारा वेळ आता लक्षणीयरीत्या कमी होईल. आधी ३० सेकंद लागणारा प्रतिसाद वेळ आता केवळ १५ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच व्यवहार अयशस्वी झाल्यास परतफेड फक्त १० सेकंदात मिळणार आहे.
कोणाला लाभ होणार?
या सुधारित प्रणालीचा फायदा सर्व UPI वापरकर्त्यांना मिळणार असून, त्यात Google Pay, PhonePe, Paytm, BHIM, WhatsApp UPI आणि बँक UPI अॅप्स यांचा समावेश आहे. यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक जलद व त्रासविरहित होईल.
सुधारणा का गरजेच्या होत्या?
दररोज कोट्यवधी व्यवहार UPI च्या माध्यमातून होतात. त्यामुळे सिस्टीमवर ताण येतो आणि काही वेळा व्यवहार लांबणीवर जातात किंवा अयशस्वी होतात. यासाठीच NPCI ने सिस्टीममध्ये आवश्यक त्या सुधारणा करत UPI ला अधिक स्थिर व सक्षम बनवले आहे.
संपूर्ण अनुभवात काय फरक जाणवणार?
वापरकर्त्यांना व्यवहार करताना अडचणी कमी भासणार असून, स्टेटस चेक, अॅड्रेस व्हेरिफिकेशनसारखी कामेदेखील अवघ्या १० सेकंदात पूर्ण होतील. पेमेंट्स अधिक वेगाने, खात्रीशीरपणे आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होतील.
ही सुधारणा UPI व्यवहारांचा स्तर उंचावणारी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातील डिजिटल व्यवहार अधिक गतिमान आणि सुकर करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.